मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयात खाटा आणि रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. मात्र, पालिका प्रशासनाने प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केले. तसेच कोरोनाबाधितांचे अहवाल पालिकेला आधी मिळतात. त्यानंतर निर्णय घेऊन खाटा आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे मुंबईमधील रुग्णालयातील खाटा रिक्त राहत आहेत. परिणामी, कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील आरोग्य यंत्रणेबाबत बोलताना भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे मुंबईत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले की रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीती निर्माण होत होती. रुग्णालयात खाटा आणि रुग्णवाहिका मिळावी म्हणून नातेवाईकांची पळापळ होत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केले आहेत. तसेच रुग्ण बाधित असल्याची माहिती आधी पालिकेला दिली जात आहे. त्यामुळे रुग्णाच्या घरी पालिकेचे पथक जाऊन तपासणी करत आहे. त्यानंतर ऑक्सिजनची मात्रा, रुग्णाला लक्षणे आहेत का? हे पाहून घरात क्वारंटाइन करणे, कोरोना सेंटरमध्ये पाठवणे, रुग्णालयात दाखल करणे यासारखे निर्णय पालिकेकडून घेतले जात आहे. त्यामुळे रुग्णाला रुग्णवाहिका आणि खाटा मिळण्यास पहिल्यासारखा वेळ लागत नसल्याची माहिती दहिसर येथील शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी दिली.
आधी रुग्णांमध्ये भीती होती. नातेवाईकही घाबरून जात होते. मात्र, आता वॉर्ड वॉररूममुळे रुग्णांना खाटा आणि रुग्णवाहिका मिळत असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका व पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. सईदा खान यांनी सांगितले.
मुंबईत रुग्णांना खाटा न मिळणे, रुग्णवाहिका न मिळणे या परिस्थितीमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. मात्र, पूर्ण दिलासा अद्याप मिळालेला नाही. रुग्णांना किती खाटा रिक्त आहेत त्याची माहिती आम्ही डॅशबोर्डवर प्रदर्शित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे नेमक्या किती खाटा रिक्त आहेत? याची माहिती नागरिकांना व रुग्णांना मिळत नसल्याचा आरोप भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. सरकारने कोरोना चाचणी करण्यासाठी 2200 रुपये व घरी जाऊन चाचणी करण्यास 2500 रुपये ठरवून दिले आहेत. त्याप्रमाणे पालिकेने नेमलेल्या प्रयोगशाळा पैसे आकारत असल्याची माहिती भाजपा स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिली.
मुंबईत किती रुग्ण -
मुंबईत 4 जुलैला कोरोनाचे एकूण 82814 रुग्ण होते. त्यापैकी 53463 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 4827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 24524 एॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
किती खाटा रिक्त -
पालिका आणि खासगी रुग्णालयात एकूण 19973 खाटा आहेत. त्यापैकी 12766 रुग्ण असून 7207 खाटा रिक्त आहेत. डेडीकेट कोरोना हेल्थ सेंटरमध्ये 13789 एकूण खाटा आहेत. त्यात 9866 रुग्ण असून 3923 खाटा रिक्त आहेत. कोरोना केअर सेंटर 2 मध्ये 6185 खाटा असून 2900 रुग्ण आहेत, तर 3284 खाटा रिक्त आहेत. कोरोना केअर सेंटर 1 मध्ये 50493 खाटा असून 12009 रुग्ण आहेत, इतर खाटा रिक्त आहेत.
अतिदक्षता विभाग अन् व्हेंटिलेटरही खाली -
पालिका आणि खासगी रुग्णालयात एकूण 1540 आयसीयू बेड आहेत. त्यावर 1410 रुग्ण असून 130 खाटा रिक्त आहेत. पालिकेकडे 8836 ऑक्सिजन बेड असून त्यावर 6390 रुग्ण आहेत, तर 2446 खाटा रिक्त आहेत. पालिका खासगी रुग्णालयात 885 व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यावर 849 रुग्ण असून 36 खाटा रिक्त आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.