मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका व्यासपीठावर आले. यावरून आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
यावर शरद पवारच उत्तर देऊ शकतात : या संदर्भात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. मंच शेअर करणे म्हणजे कुठल्यातरी विचाराला वाहून घेणे असे होत नाही. शरद पवार अनेक वर्षांपासून पुरोगामी विचाराचे आहेत. हे महाराष्ट्राला माहित आहे. कार्यक्रमामध्ये मंच शेअर केल्याबद्दल शरद पवारच उत्तर देऊ शकतात. त्यावर आम्ही अधिक बोलणे उचित नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. या संदर्भात त्यांच्या वतीने मी काही बोलणे योग्य नाही. ते मीडियासमोर येतील तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारा. ते त्याला योग्य पद्धतीने उत्तर देतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
'पुरस्काराचे राजकारण भरपूर झाले' : महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पक्षांमधील मतभेद न मानता राजकीय नेते कायमच एकमेकांसोबत व्यासपीठावर दिसतात. नरेंद्र मोदी यांना जो पुरस्कार मिळाला होता तो लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला गेला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली हा काही वादाचा मुद्दा असू शकत नाही. संजय राऊत यांच्या विरोधानंतरही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले हे एक प्रकारे चांगले झाले. शरद पवारांनी आपल्या भाषणात मोदींची काही प्रमाणात स्तुती केली. तर मोदींचे भाषण स्टेटमेंटशिपची जाणीव करून देणार होतं. पुरस्काराचे राजकारण भरपूर झाले, महाराष्ट्राने वैचारिक परंपरांचा आदर करायला शिकला पाहिजे, असे मत राजकीय विश्लेषक मृणालिनी नाणीवडेकर यांनी व्यक्त केले.
काका-पुतणे बरोबर आहेत का? : अशा बाबतींत शरद पवारांबद्दल कायम वाद निर्माण होतो, कारण ते सगळ्या पक्षांनी समान नातं ठेवतात. विचार वेगळे असले तरी शरद पवारांनी भाजपसोबत वेळो-वेळी युती करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे शरद पवारांनी भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने, काका-पुतणे बरोबर आहेत का? यावरून सहकारी पक्षांमध्ये शंका निर्माण झाली आहे. शरद पवार नेमकं काय करतील, भाजपाला देखील सांभाळून घेतील का, अशी चर्चा आता होते आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून राजकीय चर्चा नक्कीच होते, असे मृणालिनी नाणीवडेकर म्हणाल्या.
हेही वाचा :
- Ajit Pawar : ...म्हणून मी स्टेजवर शरद पवारांच्या पाठीमागून गेलो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
- Modi and Pawar : 'काका' नेमके कोणासोबत? पवार-मोदी भेटीने INDIA चे नेते नाराज
- Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ, तर मोदींनी अजित पवारांची, मोदी-पवार बॉडीलँगवेजचा अर्थ काय?