मुंबई - भारतरत्न इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेले विधान काँग्रेस खपवून घेणार नसून, या पुढील काळातही आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल बोलताना भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावी, असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिला आहे. राऊत यांनी बुधवारी पुण्यात मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना इंदिरा गांधी यांबाबत एक विधान केले. यात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाली असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा - लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे ८ डबे ओडिशात घसरले, ३० जखमी, ४ गंभीर
थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, की 'इंदिराजी गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. 1975 मध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांनी मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले.' ज्या करीम लालाबद्दल बोलले जात आहे, त्यासहीत हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा काम इंदिरांजींनी केले होते.