मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रविवारी रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.
टाळी-थालीनंतर आता दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाला इव्हेंटची नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. स्थलांतरित कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. त्याबरोबरच त्यांनी हे असले पीआर स्टंट थांबवा आणि काहीतरी ठोस पावले उचला, असा सल्लाही दिला आहे.