मुंबई - आपल्या घरातच राहा, बाहेर पडू नका, आपल्या मदतीसाठी आम्ही तत्पर असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी थोरात, यांनी यशोधन या संगमनेर येथील कार्यालयात स्वतंत्र २४x७ आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने कायम देशहीत व नागरिकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोना या विषाणूने जगभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोना हे मानव जातीवरील मोठे भयंकर संकट आहे. याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. कोरोना रोखण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून संगमनेर येथील यशोधन संपर्क कार्यालयात राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 24 तास मदत केली जाणार आहे.
गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू न मिळणे, ज्यादा दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक समस्या याबाबतच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. अशा कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये व तातडीने मदत या गरजू नागरिकांना मिळावी, यासाठी थोरात यांच्या संकल्पनेतून ही आपत्कालीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुका व जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठे मदतीचे केंद्र ठरले आहे. नागरिकांना मागील 7 वर्षात 24 तास मदत मिळत आहे.