महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भांडुपकर तरुणांची रिक्षा प्रवासासाठी गांधीगिरी

चांगले विचार एकत्र आले की त्यातून काही तरी चांगले सामाजिक कार्य होते. याची प्रचिती भांडुपकर तरुणांचे हे समाजकार्य पाहुन येते. भांडुपच्या रिक्षाचालक व प्रवाशी यांच्यात आपणाला दुवा म्हणून सांयकाळी काही तास कार्य करायचे आहे, अशी पोस्ट फेसबूकवर शेअर होताच त्यावर तरुणांनी होकार देत हे कार्य सुरू केले आहे.

रिक्षासाठी रांगेत असलेले प्रवासी

By

Published : May 12, 2019, 8:28 PM IST

मुंबई-रेल्वे स्थानकांतून मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या गर्दीतील अनेक जण एक रिक्षा पकडण्यासाठी धावत असतात. त्यातच रिक्षाने भाडे नाकारल्यास त्यावरूनही वाद होत असतात. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी भांडूप स्थानकावर पश्चिम दिशेला संध्याकाळी ६.३० वाजता सजग तरुण आणि तरुणी गोळा होतात. ही मंडळी गर्दीला विनंती करुन रांगेत उभे राहण्याचे आवाहन करतात. या कामात तरुणांना रिक्षा युनियनची देखील मदत होत आहे. यामुळे जनतेचा रिक्षा प्रवास सोयीचा झाला असल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.

नियोजन आणि शिस्त लावली तर ही गर्दी टाळता येऊ शकते हे भांडुपच्या सजग नागरिकांनी दाखवून दिले आहे.

मुंबईत रेल्वे स्थानक आणि आजुबाजू्च्या परिसरात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे रिक्षा चालक व प्रवाशी यांच्यात कायम वाद पाहायला मिळतो. यावर तोडगा निघणे सध्या तरी कठीण वाटत आहे. भांडुप रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला बाहेर रिक्षासाठीकायम गर्दी होत असते. नियोजन नसल्याने रोज गोंधळाचे वातावरण निर्माण होते. यावर पर्याय म्हणून भांडूपच्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. पण नियोजन आणि शिस्त लावली तर ही गर्दी टाळता येऊ शकते हे भांडुपच्या सजग नागरिकांनी दाखवून दिले आहे.

या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे भांडुपकर तरुणांनी पुढाकार घेऊन अशा घटना घडायला नकोत म्हणून हे शिस्तीचे कार्य आम्ही आपल्या कामाच्या वेळ नुसार पार पाडत आहोत, असे किरण गायचोर म्हणाले. आम्ही २० लोक रोज सांयकाळी ६.३० ते रात्रीचे ११ वाजेपर्यंत रिक्षाचालक व प्रवाशी यांच्यात समन्वय साधत आहोत. त्यामुळे भांडुपच्या नागरिकांना रिक्षा मिळणे सुलभ होत आहे.

याआधी बराच वेळ रांगा लावून न मिळणारी रिक्षा मागील ३ दिवसांपासून ५ ते १० मिनिटांत उपलब्ध होत आहे. असेच चित्र कायमस्वरूपी दिसावे, यासाठी सजग तरुणांची धडपड सुरू आहे. या मोहिमेला रिक्षाचालक आणि सामान्य प्रवासी देखील सहकार्य करत आहेत. असे अजिंक्य भोसले म्हणाले. येथे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसतात त्यामुळे चालणे कठीण होत असते. या अगोदर येथे रिक्षा तळ होता. पण फेरीवाल्यांनी त्यावर अतिक्रमण केल्याने गायब झाला आहे. रिक्षा तळ पुन्हा निर्माण करून भांडुपकरांचा प्रवास सोयीचा करावा, अशी आमची मागणी असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

चांगले विचार एकत्र आले की त्यातून काही तरी चांगले सामाजिक कार्य होते. याची प्रचिती भांडुपकर तरुणांचे हे समाजकार्य पाहुन येते. भांडुपच्या रिक्षाचालक व प्रवाशी यांच्यात आपणाला दुवा म्हणून सांयकाळी काही तास कार्य करायचे आहे, अशी पोस्ट फेसबूकवर शेअर होताच त्यावर तरुणांनी होकार देत हे कार्य सुरू केले आहे. भांडुपकर तरुण करत असलेली गांधीगीरी मुंबईतल्या इतर स्थानकांवरही पाहायला मिळाली तर प्रवाशांची रोजच्या मानसिक त्रासातून मुक्तता होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details