मुंबई : राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असले तरी अद्याप विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असतानाही ते आपला विरोधी पक्षनेता नेमू शकत नाहीत तर, हे लोक देश काय चालवणार? असा सवाल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच उपस्थित केला आहे. केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जोरदार प्रत्युत्तर केसरकर यांना दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्ही पाडले : यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, दीपक केसरकर जी आपण शिक्षण मंत्री आहात पण आपण किती अशिक्षित आहात याचे उदाहरण म्हणजे, आपण जे म्हटले की काँग्रेस विरोधी पक्ष नेता नेमू शकत नाही तर देश काय चालवणार? मग आता मोदीजीं बद्दल आपण काय बोलणार, कारण कर्नाटकात 55 दिवसानंतरही विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्ही पाडले आणि गद्दारांचे सरकार आले.
महाराष्ट्रात एका व्यक्तीकडे सहा सहा जिल्ह्यांचा प्रभार आहे. तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही आणि मोदींना देश चालवता येत नाही हे आता जनतेने ओळखले आहे. - अतुल लोढे, मुख्य प्रवक्ता कॉंग्रेस
तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही : चाळीस दिवस झाले तरी तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करता आला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आले त्यांनी महत्त्वाची खाती घेतली. आपण 40 लोक केवळ तोंड पाहत राहिलात. अजून पर्यंत आपले पालकमंत्री ठरले नाही. महाराष्ट्रात एका व्यक्तीकडे सहा सहा जिल्ह्यांचा प्रभार आहे. तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही आणि मोदींना देश चालवता येत नाही हे आता जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच भीतीपोटी तुम्ही असे विधान करत आहात असेही अतुल लोंढे म्हणाले.
हेही वाचा -
- Minister Advise To Students : विद्यार्थ्यांनो! आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, सरकार तुमच्या पाठीशी- शिक्षण मंत्री दीपक केसरकर
- Monsoon Session 2023: विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड तपासणीचा संच मान्यतेवर परिणाम नाही - शिक्षण मंत्री
- Monsoon Session 2023: शालेय विद्यार्थ्यांना मिळणार रुचकर मध्यान्ह भोजन