मुंबई Dharmaveer २ Movie : 13 मे 2022 रोजी ‘धर्मवीर (मुक्काम पोस्ट ठाणे) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत, अनेक पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमातून शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा सामजिक तसंच राजकीय प्रवास उलगडण्यात आला होता. धर्मवीर पार्ट 1 च्या प्रचंड यशानंतर आता “धर्मवीर 2” हा सिनेमा देखील येत आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. धर्मवीर 2, साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट अशी टॅगलाईन या सिनेमाच्या पोस्टरवर दिसत आहे. हा चित्रपट मंगेश देसाई निर्मित असणार आहे. यात दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता प्रसाद ओक हे पहिल्या भागाप्रमाणे धर्मवीर-2 मध्ये देखील सारखीच टीम असणार आहे. एकिकडं या सिनेमाची उत्सुकता सिनेप्रेक्षकांनी लागलेली आहे. तर, “धर्मवीर 2” या सिनेमाच्या निमित्तानं अनेक प्रश्न सामाजिक, राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.
बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न? :हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा 2019 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर आता चार वर्षानंतर देखील 'ठाकरे' सिनेमाचा दुसरा भाग आलेला नाही. मात्र, दुसरीकडं मागील वर्षी धर्मवीर चित्रपटच्या प्रदर्शनानंतर अगदी वर्ष-दिड वर्षाच्या आतच धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्कवितर्क काढले जाताहेत. एकिकडं मागील आठवड्यात एकनाथ शिंदेंना हिंदूहृदयसम्राट म्हटल्यानंतर मोठं वादंग निर्माण झालं होते. यानंतर आता धर्मवीर सिनेमा काढून एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करताहेत, असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. तसेच निवडणुकांच्या तोंडावर धर्मवार हा सिनेमा प्रदर्शित करुन, अधिकाधिक लक्ष केंद्रीत करण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव असल्याचं देखील बोललं जात आहे.
बाळासाहेब महान व्यक्तीमत्व : धर्मवीर या सिनेमामुळं बाळासाहेबांचं महत्व अजिबात कमी होऊ शकत नाही. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही गुरु-शिष्यातील संबंध धर्मवीर 2 मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटामुळं कोणीही बाळासाहेबांचे महत्त्व करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कोणी मनात आणलं तरी बाळासाहेबांचं महत्व कमी होणार नाही, कारण बाळासाहेबांचं काम प्रचंड मोठं आहे. त्यामुळं बाळासाहेबांचं महत्व कमी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं धर्मवार 2 सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी म्हटलं आहे. दुसरीकडं बाळासाहेब महान व्यक्तीमत्व आहे, त्यामुळं त्यांचं महत्त्व कमी करण्याचा बिल्कुल प्रश्नच येत नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सांवत यांनी म्हटलं आहे.