मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporation) कार्यकाळ ७ मार्च २०२२ मध्ये संपला आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये अपेक्षित होती. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली. दरम्यान राज्य सरकारने पालिकेतील २२७ प्रभागांच्या संख्येत ९ ने वाढ करून २३६ केली आहे. निवडणूक विभागाच्या आदेशाने प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण लॉटरी काढण्यात आली आहे. २३६ पैकी ५० टक्के प्रभाग महिलांसाठी, १५ प्रभाग अनुसूचित जाती व २ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसीसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आलेले नाहीत. ओबीसींच्या ६१ जागा खुल्या करण्यात आल्या आहेत.
वेट ऍण्ड वॉच ची भूमिका :ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने बांठिया आयोग नियुक्त केला आहे. या आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचा इंपेरियल डेटा गोळा केला जात आहे. हा डेटा सर्वोच्च न्य्यायालयात सादर केल्यास ओबीसींना आरक्षण दिले जाईल अशी शक्यता आहे. ओबीसींना आरक्षण दिल्यास अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे प्रभाग आरक्षण वगळता इतर प्रभागांमध्ये पुन्हा लॉटरी काढली जाणार आहे. असे झाल्यास सध्या जाहीर केलेले आरक्षित प्रभाग पुन्हा बदलणार आहेत. सध्यातरी कोणी रिस्क घ्यायला तयार नाहीत. सर्वच इच्छुक आणि माजी नगरसेवक ओबीसी आरक्षणाची वाट बघत आहे. त्या लॉटरीनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने इच्छुकांनी वेट ऍण्ड वॉचची भूमिका (Aspiring candidates in the role of wait and watch ) स्वीकारली आहे अशी माहिती जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.