नवी मुंबई - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण खटला माधुरी आनंद, जिल्हा सत्र न्यायाधीश, पनवेल यांच्याकडे गुरुवार (दि. 13) पासून वर्ग करण्यात आला आहे. अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी न्यायाधीश राजेश आस्मर यांच्यावर आक्षेप घेतला होता. त्यांच्याकडून खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश, अलिबाग यांना न्यायाधीश बदलण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे हा खटला न्यायाधीश माधुरी आनंद यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली व हत्या प्रकरणाची सुनावणी देणारे न्या. राजेश आस्मर यांनी सोबत काम केले असल्यामुळे या खटल्यात आपणास न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, त्यामुळे हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली होती. तसेच राजू यांनी मागील सुनावणीत पनवेल सत्र न्यायालयात न्या. राजेश आस्मर यांच्यापुढे साक्ष नोंदवून घेण्यासही नकार दिला होता, तसे पत्रही गोरे यांनी न्यायाधीशांना सादर केले होते.