महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हव्या तेवढ्या यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका - अशोक चव्हाण - महाजनादेश यात्रा

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूर परिस्थिती असताना महाजनादेश यात्रा काढून लोकांकडे मते मागायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. मात्र, सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका चव्हाणांनी केली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

By

Published : Aug 7, 2019, 9:59 PM IST

मुंबई- मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. मात्र, यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यावर ‘धर्मा पाटील’ होण्याची दुर्दैवी वेळ मुख्यमंत्र्यांनी आणू नये, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील 6 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी अनास्थेमुळे या 6 शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. मुख्यमंत्री या 6 शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर घटनेची साधी दखलही न घेता आणि या शेतकऱ्यांना न भेटताच अकोला दौरा आटोपता घेतला. याचा अशोक चव्हाणांनी निषेध केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूर परिस्थिती असताना महाजनादेश यात्रा काढून लोकांकडे मते मागायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. मात्र, सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका केली.

अकोल्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत यांचा समावेश होता. याच मुरलीधर राऊत यांनी नोटबंदीच्या काळात प्रवाशांकडे पैसे नसताना त्यांच्या विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांचे जाहीर कौतूक केले होते. त्याच शेतकऱ्यावर भाजप सरकारच्या काळात शासकीय अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ येते, हे लाजीरवाणे आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या 6 शेतकऱ्यात दीड वर्षापूर्वी आत्महत्या केलेले शेतकरी भारत टकले यांच्या पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री मंगळवारी अकोल्यात होते. त्यामुळे त्यांनी मुरलीधर राऊत आणि अर्चना टकलेसह त्या सहाही शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात होती. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यांची साधी दखलही घेऊ नये, हे दुर्दैव असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

जमीन अधिग्रहणात योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. शेजारच्या जमिनीच्या मालकाचे मंत्र्याशी लागेबांधे आहेत म्हणून त्याला जास्त पैसे मिळाल्याची तक्रार धर्मा पाटील यांनी केली होती. तोच प्रकार अकोल्यात घडला आहे. ज्यांचे अकोल्याच्या पालकमंत्र्यांशी संबंध आहेत, त्यांना जमिनीचा जास्त मोबदला मिळाल्याचा आरोप तेथील शेतकरी करत आहेत, असेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांची हीच तक्रार आहे. हदगाव, अर्धापूर, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्या आहेत. त्यांना मिळालेला मोबदला अतिशय कमी आहे. वाढीव मोबदला मिळावा, म्हणून ते शेतकरी आणि मी 2 वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. पण, सरकारने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही, याकडेही चव्हाणांनी यावेळी लक्ष वेधले.

ABOUT THE AUTHOR

...view details