महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashok Chavan Attack On Government : मंत्रिमंडळाच्या निर्णयक्षमतेवर राज्य सरकारचेच प्रश्नचिन्ह, अशोक चव्हाणांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे ग्राह्य धरुन नये असा आदेश काढला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने स्वतःच मंत्रिमंडळाच्या विचार आणि निर्णयक्षमतेवर उपस्थित प्रश्नचिन्ह केल्याचा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Ashok Chavan Attack On Government
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 12, 2023, 7:29 PM IST

मुंबई - राज्य सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा आदेश काढला आहे. त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनीही सरकारच्या या आदेशावर हल्लाबोल केला आहे. हा शासन निर्णय म्हणजे राज्य सरकारने स्वतःच मंत्रिमंडळाच्या विचार व निर्णयक्षमतेवर उपस्थित प्रश्नचिन्ह केल्याची जोरदार टीका अशोक चव्हाण यांनी केली. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर ते बोलत होते.

हा शासन निर्णय हास्यास्पदसरकारने घेतलेला हा निर्णय केविलवाणा व तेवढाच चिंताजनक आहे. या शासन निर्णयाने राज्य सरकारच्या तथाकथित सुशासनाच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहे. सरकारने स्वतःच स्वतःची केलेली अप्रतिष्ठा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नयेत, असा लेखी आदेश खुद्द सरकारने प्रशासनाला देणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखेच आहे, असे चव्हाण म्हणाले.

अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे दबावगटमागील अनेक दिवस विद्यमान राज्य सरकारच्या कारभाराबाबत प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांमधून उलटसुलट चर्चा सुरू होती. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे काही विशिष्ट लोकप्रतिनिधींनी दबावगट निर्माण केला आहे. ते नियमांची अजिबात तमा न बाळगता वाट्टेल त्या कामांबाबत आग्रह धरत असल्याचे बोलले जात होते. दबावाला बळी पडून त्यांच्या पत्रांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रिमंडळातील सदस्यांकडून दिले जातात. शासकीय कामकाजाबाबतचे प्रस्ताव, मंजुरी आदेशांचे आदानप्रदान चक्क व्हॉट्सअॅप व फोनवरूनच केले जाते, अशीही चर्चा होती. या सर्व चर्चेवर सदर शासन निर्णयामुळे जणू मोहर लागली आहे. तसे नसते तर हा शासन निर्णय काढावाच लागला नसता, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांनी पुरेशी दक्षता बाळगणे अपेक्षितनिवेदने, पत्रांवर शेरे लिहिताना मंत्र्यांनी पुरेशी दक्षता बाळगणे अपेक्षित आहे. पत्रातील मजकूर योग्य असेल तरच त्यावर निर्णायक स्वरूपाचा शेरा दिला पाहिजे. एखादी मागणी नियमात बसते की नाही, याबाबत साशंकता असल्यास संबंधित निवेदनावर 'तपासून नियमानुसार कार्यवाही करणे' असा शेरा दिला जाऊ शकतो. या पद्धतीने मंत्र्यांचाही सन्मान राखला जातो व प्रशासनावरही नियमबाह्य, अयोग्य कामांसाठी दबाव निर्माण होत नाही. परंतु, या अजब सरकारमध्ये गजब कारभार सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नये, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याची टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details