मुंबई- नाना चौक येथे झालेली घटना, हा एक अपघात आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला शिवसेनेशी जोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. शनिवारी वॉल रिपेअरिंगसाठी गेल्यानंतर गटारात विषारी वायूने गुदमरलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यांनी घटनास्थळी जाऊन रात्री घडलेल्या घटनेची माहितीही घेतली.
सर्वच दुर्घटनांचा संबंध शिवसेनेशी जोडणे चुकीचे - अरविंद सावंत - मुबंई
नाना चौक येथे झालेली घटना, हा एक अपघात आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला शिवसेनेशी जोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
मुंबईकरांवर असलेले मुत्यूचे संकट काही केल्या थांबताना दिसत नाही. २ दिवसांपूर्वीच सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे झालेल्या पादचारी पुलाच्या दुर्घटनेत ६ जणांचा मुत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री गटारात विषारी वायूमुळे एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला. तर ४ जण अत्यवस्थ झाले होते. राकेश निकम असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर सुरेश पवार, उमेश पवार, बाळासाहेब आणि शांताराम भटके यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नायर रुग्णालयाचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
सावंत यांनी उपचार घेत असलेल्या कामगारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांना, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत चिंता करू नका, असे सांगितले. तसेच मुंबई महापालिकेत जरी शिवसेनेची सत्ता असली आणि हे जखमी रुग्ण जरी महापालिकेचे असले तरीही या घटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी यावेळी हा फक्त एक अपघात असल्याचे सांगितले.