मुंबई- मागील ५ वर्षे शिवसेना आणि भाजपचे संबंध दुरावले होते. पण, एकाच घरात भांडणे होत असतात. आपला परिवार एकच आहे. 'झाले गेले गंगेला मिळाले', असे समजून प्रचाराला लागा, असे आवाहन दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केले. दक्षिण मुंबई मतदारसंघ येथील शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले.
झाले गेले गंगेला मिळाले, आता प्रचाराला लागा - अरविंद सावंत - मेळावा
'झाले गेले गंगेला मिळाले', असे समजून प्रचाराला लागा, असे आवाहन दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केले.
बिर्ला मातोश्री सभागृहातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दक्षिण मुंबईचे सेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी दीड तास या कार्यक्रमात सहभाग दर्शवला. मोदी यांच्या कार्यपद्धतीने मी अतिशय सुखावलो आहे. त्यांनी कधीही शिवसेनेचा खासदार म्हणून माझ्याकडे पाहिले नाही, अशी स्तुती सुमनेही सावंत यांनी यावेळी मोदींच्यावर उधळली.
यावेळी काही काळ शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, गांधीनगरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नामांकन दाखल करण्याचा कार्यक्रमात सहभागी होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मने जुळली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही मनात अढी न ठेवता काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपचे नेते विनोद तावडे, सेनेचे खासदार अनिल देसाई, आमदार राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.