मुंबई - गेल्या वर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे मनोरंजनसृष्टीवर आघात कोसळला होता आणि अजूनही परिस्थिती काही चांगली नाही. या काळात अनेक कलाकार तंत्रज्ञांचा कोरोनामुळे बळी गेला. परंतु, कोरोना काळातच, चित्रपटसृष्टीतील एका तंत्रज्ञाने आत्महत्या केली असून त्याचा कोरोना महामारीशी तसा काही संबंध नाही. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यापूर्वी आर्थिक विवंचनेतून काही आत्महत्येची प्रकरणं समोर आली असली, तरी सापते यांनी वेगळ्याच कारणासाठी स्वतःचा जीव घेतला. खरंतर एका वेगळ्या रीतीच्या ‘महामारी’मुळे त्यांचा हकनाक बळी गेला. आत्महत्या करण्यापूर्वी राजू सापते यांनी एक व्हिडीओ शूट करून प्रसिद्ध केला आणि त्यांच्या हत्येला कोण कारणीभूत आहे हे नमूद केले.
आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केला शेयर -
या व्हिडीओ मध्ये त्यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीतील एका लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्या हा त्यांना नाहक त्रास देत आहे आणि बदनामी करत कामगारांचे पैसे बुडविल्याचा आरोप करीत आहे. जो तद्दन खोटा आहे. या व्हिडीओमध्ये राजू सापते म्हणाले की, ‘नमस्कार, मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. हे शूट करीत असताना मी कोणतीही नशा केलेली नाही आणि पूर्णपणे शुद्धीत आहे. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनचे पदाधिकारी आहेत, ते मला उगाचच खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचे पेमेंट तिथे थकीत नाही. सगळी पेमेंट्स नियमितपणे केलेली आहेत. माझ्याबद्दल लेबर युनियनमध्ये एकही तक्रार नाही. तरीही राकेश मौर्या हा व्यक्ती युनियनमधील काही कामगारांना मुद्दाम फोन करून, त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’
राजू सापते यांनी पुढे म्हटलेय की, 'मी नरेश मेस्त्री नामक व्यक्तीला फोन करून विचारले असता त्याने सांगितले की मी त्याचे कसलेही पेमेंट थकविलेले नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहे आणि माझ्या कामात बाधा घालत आहे. सध्या माझ्याकडे ५ प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. राकेश मौर्याच्या त्रासामुळे मला 'झी'चे एक मोठा प्रोजेक्ट सोडून द्यावा लागला, तसेच दशमी क्रिएशनचे काम सुरु असताना त्याच्यामुळे ते मध्येच थांबवले गेले. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’