महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा; असा असायचा 'गेम प्लॅन' - MAHESH BAGAL

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देत अनेकांना लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत

अटकेतील आरोपी

By

Published : May 25, 2019, 12:34 PM IST

मुंबई- रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देत अनेकांना लुबाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने या टोळीने आतापर्यंत शेकडो जणांना चुना लावला असून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. पोलिसांनी उत्तर प्रदेश, बिहार व मुंबईतून ३ जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे.

गुन्हे शाखेने आतापर्यंत या प्रकरणी राजेश कुमार अधोक ताती (वय २८ वर्षे), मनिशसिंह विरेंद्रसिंह उर्फ सरोजकुमार उदयभान राय (वय ३९ वर्षे) यांच्यासह एका महिला आरोपीला अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही टोळी वेगवेगळ्या राज्यातील शहरात फिरून स्वतः रेल्वेत आपण चीफ पर्सनल ऑफिसर आहोत. रेल्वेत भरतीसाठी आपण काम करून देऊ शकतो त्यासाठी प्रत्येकी ७ लाख रुपये टप्याटप्याने द्यावे लागतील, असे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हे आरोपी सांगत होते. आतापर्यंत या टोळीने शेकडो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लुटल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. नकली ओळख पत्र, नियुक्ती पत्र देऊन 1 महिना काम करून पगारही दिला.


या टोळीच्या आमिषाला बळी पडलेल्या काही तरुणांना या आरोपींनी नकली ऑफर लेटर देऊन त्यांची परीक्षाही घेतली होती. लेखी परीक्षा झाल्यानंतर या टोळीने पीडित युवकांना चक्क रेल्वेचे ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले होते. बनावट प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या टोळीने पीडित युवकांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर तब्बल १ महिना फिरण्यास सांगितले होते. मात्र, काम काय करायचे हे मात्र सांगितले नाही. या एक महिन्याच्या कालावधीत या युवकांकडून सदरचे हे आरोपी बनावट सर्विस बुक भरून घेत होते.

१ महिना झाल्यानंतर पीडित युवकांना संशय येऊ नये म्हणून या टोळीने त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांचा पगारही जमा केला. आता १ महिना झाला असून तुमची दुसऱ्या ठिकाणी बदली होणार असून तुम्ही सुट्टी घेऊन काही दिवस घरी जा, असे या युवकांना सांगण्यात आले. मात्र, घरी आल्यानंतर या टोळीशी पीडित युवकांचा संपर्क न झाल्याने आपण फसलो गेलो असल्याचे पीडितांच्या लक्षात आले. याबद्दल पोलीस तक्रार करण्यात आली होती. अटक आरोपींचे आणखी काही साथीदार फरार असून या आरोपींविरोधात मुंबईसह बिहार, उत्तर प्रदेशमधील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details