रायगड -अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या क्वारंटाइन जेलमधून सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवले असल्याचे सांगितले जात आहे. तरी याबाबत आता वेगळी कारणे पुढे येत आहेत. अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात असताना आपला मोबाईल फोन वापरल्याचे समोर आले आहे. तुरुंगात असताना त्यांच्याकडे फोन आला कसा? याची चौकशी आता सुरू आहे.
अर्णबकडे मोबाईल आला कसा -
अर्णब गोस्वामी यांना बुधवारी 4 नोव्हेंबरला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर रात्री उशिरा त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपालिका शाळा क्रमांक - 1 मधील तात्पुरत्या क्वारंटाइन तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपला फोन वापरल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी ते लाइव्ह असल्याचे सोशल मिडियावर दिसून आल्याने कारागृह प्रशासनाशी बोलून त्यांना तातडीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्याकडे मोबाईल कसा आला? आता याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी जमीर शेख यांनी सांगितले. तर अलिबाग कारागृहाचे अधिक्षक ए. टी. पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा -अर्णब गोस्वामींच्या समर्थनात राम कदमांची खार ते सिद्धिविनायक पायी यात्रा