मुंबई : नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे. काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 18 जणांवर उपचार सुरु आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. रुग्णांवर नवी मुंबईतील खारघरच्या एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली. या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
'कार्यक्रमाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला' :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर टीका करताना, सरकारने या कार्यक्रमाचा वापर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी केला, असा आरोप केला आहे. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी देखील या प्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे.
'आप'ने केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारने केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भर उन्हात खुल्या मैदानात कार्यक्रम घेतला, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. या सोबतच त्यांनी सरकारने पीडितांना दिलेल्या मदतीवरही सवाल उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा :Bawankule And Shelar Left To Delhi: भाजप प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना; अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण