महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम बळकट करू - आयुक्त - NCP

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम बळकट केले जातील. तसेच रॅगिंगबाबतच्या तक्रारींची त्वरित गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सभागृहात दिले.

अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम बळकट करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

By

Published : Jun 1, 2019, 9:10 AM IST

मुंबई- शहरातील इतर महाविद्यालयांत असलेल्या अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम व नियमावलीनुसारच महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम बळकट केले जातील. तसेच रॅगिंगबाबतच्या तक्रारींची त्वरित गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सभागृहात दिले. महापालिकेच्या सभागृहात नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी आत्महत्येसंदर्भातील चर्चेला प्रशासनाकडून उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.

अॅन्टी रॅगिंग कमिटीचे नियम बळकट करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने आपल्या वरिष्ठांच्या जातीय आणि रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका सभागृहात निवेदन केले. मुंबईसारख्या शहरात जातीवरून त्रास देणे हा निंदनीय प्रकार आहे. नायर रुग्णालयामध्ये याआधीही एमआरआय मशीनमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाले होते. आता एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे. असे प्रकार घडणाऱ्या रुग्णालयाच्या प्रमुखाला पालिकेच्या मोठ्या रुग्णालयाचे संचालक बनवले जाते. त्याला पदोन्नती दिली जाते, हे अयोग्य असल्याचे रवी राजा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

राष्ट्र्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी डॉ. पायल प्रकरणात प्रशासनाची नाचक्की झाली आहे. रुग्णालयात डॉक्टरांचा तर आरोग्य विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा छळ सुरु असल्याचे सांगितले. डॉक्टर आणि नर्सची रिक्त पदे भरण्याची त्यांनी मागणी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मागील २ वर्षात केलेल्या तक्रारींकडे लक्ष दिले असते तर आज अशी वेळ आलीच नसती असे सांगितले. रुग्णालयाचे अधिष्ठाता वेळ देत नसल्याचा आरोप शेख यांनी केला. यावर डॉ. पायल आत्महत्या प्रकरणाची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी सुरु असून रुग्णालयातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून अॅन्टी रॅगिंग कमिटीकडे आलेल्या तक्रारींचा आढावा दर २ ते ३ महिन्यांनी घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

पायल प्रकरणी बोलणाऱ्यांना धमक्या -

डॉ. पायल आत्महत्या प्रकरणात कोणालातरी वाचवण्याचा प्रकार सुरु आहे. नायर रुग्णालयातील सहाय्यक अधिष्ठाता आणि जॉईंट चिफ पीओ या पदावरील दोन महिलांकडून पायल प्रकरणी पोलिसांना किंवा इतरांना काही सांगितल्यास कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी व्हावी म्हणून या दोन्ही महिलांना त्वरित पदावरून हटवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details