मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपासापेक्षा राजकारण अधिक होत असल्याचे वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. या प्रकरणात सत्य बाहेर कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून येते, यापेक्षा सत्य बाहेर येणं हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे परब म्हणाले. या प्रकरणात विरोधक हे राजकारण करत असून, सरकारला बदनाम करत असल्याचा आरोपही परब यांनी केला.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. पैशांचा अपहार झाल्याची बिहार कोर्टाने दाखल केलेली केस सीबीआयकडे वर्ग केली आहे. सुशांतसिंहच्या अकाऊंटमधून 17 कोटींचा अपहार झालेला आहे, हे पैसे रिया चक्रवर्तीने घेतले असून, ते पैसे गेल्यामुळे माझ्या मुलाला आत्महत्या करावी लागल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.
अनिल परब यांची विरोधकांवर टीका
सीबीआयचे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत येईल, त्यासाठी काही अडचण नाही. मुंबई पोलिसांचा तपास स्वतंत्र आहे. एखादया गुन्ह्याचा तपास दुसऱ्या राज्यात करतो, तेव्हा ते पोलीस एकमेकांशी समन्वय साधतात. मात्र, या प्रकरणात राजकारणासाठी कोणी येत असेल तर त्याला मुंबई पोलिसांनी विरोध केला तर त्यात काय चूक असल्याचे वाटत नसल्याचे अनिल परब म्हणाले.
भाजप काय प्रश्न विचारते हे महत्वाचे नाही, कायदा सर्वांसाठी समान आहे. उद्या ते कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आले तर त्यांची अडवणूक होणार नाही. क्वारंटाईनचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत. उद्या सरकारला प्राथमिक तपासणी करावीशी वाटल्यास आम्ही ती करणार, तो आमचा अधिकार आहे, असे प्रत्युत्तर अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या टीकेला दिले. या दोन दिवसात चित्रपट क्षेत्राशी निगडीत दोन कलाकारांनी आत्महत्या केल्या. त्याचा तपासही सीबीआयने करावं का? असा उपरोधक सवालही परब यांनी विरोधकांना केला. या प्रकरणात विरोधक हे राजकारण करत आहेत. सरकारला बदनाम करत आहेत. राजकारणातून आरोपांच्या फेऱ्या होत असल्याचे अनिल परब म्हणाले.