मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करणाऱ्या सुरेश वराडे यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. अन्वय नाईक हत्या प्रकरणात अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी योग्य तपास न करता, हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गृह विभागाकडून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. सध्या ते पालघरमध्ये कार्यरत आहेत.
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. अन्वय नाईक प्रकरण घडले, तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर तर अलिबाग डीवायएसपी म्हणून निघोट हे होते. आत्महत्या प्रकरणात अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता यांनी तक्रार केली होती. त्यामुळे वराडे यांच्यासह तत्कालीन पोलीस अधिक्षक अनिल पारसकर व डीवायएसपी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारी नुसार, आरोपी अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे अलिबाग पोलीस ठाण्यात रेकॉर्ड करणे अपेक्षित होते. परंतु, ते मुंबईत रेकॉर्ड करण्यात आले.