मुंबई- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयमार्फत तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तपरमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री आनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत सुरू आहे. सीबीआयने आज (दि. 14 एप्रिल) अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. सकाळी दहा वाजता अनिल देशमुख सीबीआयसमोर चौकशीला हजर झाले. त्यांची चौकशी तब्बल 11 तास करण्यात आली.
सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडताना माजी मंत्री देशमुख आत्तापर्यंत कोणाचे जबाब नोंदवण्यात आले आहेत
सीबीआयने या प्रकरणात तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे. तसेच अनिल देशमुख यांचे सहायक पालांडे आणि कुंदन यांची देखील आठ तास चौकशी करून जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांची दोन दिवस चौकशी करून सीबीआयने जबाब नोंदवला आहे. तसेच वाझेचे दोन चालक यांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. या वसुली प्रकरणात महेश शेट्टी या एका बारच्या मालकाचाही जबाब नोंदवलेला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात ज्यांनी याचिका केली त्या याचिकाकर्ता वकील जयश्री पाटील यांचा ही जबाब सीबीआयकडून नोंदवण्यात आला आहे.
डायरी अन् कागदपत्र सीबीआयकडे
कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) करत आहे. तपासा दरम्यान सचिन वाझेच्या कार्यालयातून एक डायरी एनआयएनने जप्त केली आहे. या डायरीमध्ये काही बार, रेस्टॉरंट, पब यांची नावे आहेत, असे समजते. ही डायरी आणि कागदपत्र न्यायालयाच्या परवानगीने सीबीआयने एक प्रत आपल्या ताब्यात घेतली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक गाडी सापडली. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले. एनआयएन त्यांना अटक केली. त्यानंतर तात्कालीन पोलीस मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. बदलीच्या दुसऱ्या दिवशी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप लावण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे धाडलं. उच्च न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, असे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले मात्र अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
हेही वाचा -कांदिवलीतील इ.एस.आय रुग्णालयामध्ये भातखळकर यांच्या हस्ते वॅक्सिन सेंटरचे उद्घाटन