मुंबई : अमृता फडणवीस यांनी आरोप केला होता की, बुकी असलेला अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी एकत्र कट रचत अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दहा कोटी रुपये खंडणी आणि लाच देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या मोबाईल क्रमांकावर विविध व्हिडिओ फोटो आणि संदेश पाठवले. या सर्व प्रकरणाची चाहूल लागताच अमृता फडणवीस यांनी मलबार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवला होता. त्यानंतर बाप आणि लेकीवर तात्काळ कारवाई केली गेली. सध्या दोघेही तुरुंगात आहेत. मात्र अनिल जयसिंघानी याने या सर्व आरोपाला नाकारत आमची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. सरकारी पक्षाच्या वकिलांनी याबाबत दावा केला की, अनिल जयसिंघानी आणि मुलगी अनिक्षा यांच्या एकूण व्यवहारांमध्ये संशयास्पद बाबी आढळलेल्या आहेत. ज्या रीतीने त्यांनी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी यांची न्यायालयीन कोठडी आवश्यक आहे.
अटक बेकायदेशीर : 16 मार्चला मुलगी अनिक्षा आणि 20 मार्च रोजी अनिल जयसिंगानींना अटक करण्यात आली होती. आपल्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असून करण्यात आलेली अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामुळे आम्हाला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचेही ते बोलले होते. अटक झाल्यानंतर 24 तासांच्या आत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर करणे हे कायद्यानुसार जरूरी आहे; मात्र पोलिसांनी त्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, असे देखील अनिल जयसिंघानी यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटले आहे.