मुंबई - बोरिवलीतील भगवती रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आजपासून सुरू करण्यात आला. अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर कक्षाचे लोकार्पण मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या हस्ते आज करण्यात आले. अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर कक्षामुळे उपनगरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बोरिवलीमधील भगवती रुग्णालयात ६९ बेडसचे कोविड रुग्णालय मार्च महिन्यापासून सुरू झाले होते.
कोरोनाच्या रुग्णांना लागणाऱ्या वाढत्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची मागणी लक्षात घेता भगवती रुग्णालयात अतिदक्षता कक्ष सुरू करावा, अशी मागणी आमदार विलास पोतनीस यांनी केली होती. पोतनीस यांनी सातत्याने मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे व महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे व प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी सतत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.