महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवतीर्थावर शिंदे ठाकरे गटात राडा; मस्ती तर उतरवणारच, अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्लाबोल - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

Ambadas Danve On Shinde Faction : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावर राडा झाला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

Ambadas Danve On Shinde Faction
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 2:42 PM IST

मुंबई Ambadas Danve On Shinde Faction : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलाच राडा झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या धक्काबुक्कीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "शिवसैनिकांनी काल संयम दाखवला आहे. मात्र त्यांनी पक्षाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांची मस्ती तर उतरवणारच", अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला इशाराही दिला आहे. शिवसैनिकांवर दाखल होणारे गुन्हे आम्ही सर्टिफिकेट मानतो, असंही दानवे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी संध्याकाळी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. मात्र यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत चांगलाच राडा झाला. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतिशय तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. "शिवसैनिकांनी काल अतिशय संयमानं आपला विरोध व्यक्त केला आहे. ज्यांनी शिवसेनेशी आणि शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांची मस्ती तर शिवसैनिक उतरवणारच" असंही दानवे म्हणाले आहेत.

गुन्हे दाखल होणं हे प्रमाणपत्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात विचारलं असता दानवे म्हणाले की "शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होणं, हे काही नवं नाही. अशा पद्धतीचे किरकोळ गुन्हे दाखल होणं हे शिवसैनिक प्रमाणपत्र मानतात. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढं चांगलाचं धडा शिकवू", असंही दानवे यावेळी म्हणाले.

पिस्तूल काढणाऱ्यांना नैतिक अधिकार नाही :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉड काढून मारामारी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. या संदर्भात विचारलं असता, दानवे म्हणाले की, "ज्यांनी रिवाल्वर काढून हवेत गोळ्या झाडल्या, त्यांना रॉड काढल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक हे अतिशय संयमी आहेत, महिलांचा कधीही अपमान करत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाच्या ज्या महिला नेत्या आरोप करत आहेत, ते आरोप चुकीचे आहेत. त्या महिला नेत्यांनी जाहीर रॅलीमध्ये काय दिवे लावले, हे सर्वांना ठाऊक आहे, असंही दानवे यावेळी म्हणाले.

हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध :शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी दंगल घडवण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत निषेधार्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष आहेत. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वर्तन हे अयोग्यच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अद्भुत शक्ती आणि चैतन्य असलेली व्यक्ती होती. त्यांच्या चरणस्पर्शानं आपल्याला वेगळी अनुभूती येते", असंही भुसे यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची बाळासाहेबांना आदरांजली, वाचा कोण काय म्हणाले?
  2. बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन; शिवतीर्थावर शिंदे ठाकरेंच्या समर्थकांमध्ये 'राडा', तब्बल 300 पोलीस तैनात

ABOUT THE AUTHOR

...view details