मुंबई - राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. खातेवाटप होण्याआधीच या मंत्र्यांना आता बंगले वाटप करण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
कोणाला कोणता बंगला?- छगन भुजबळ यांना ब-6 सिद्धगड हा बंगला देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांना क-8 विशालगड बंगला, दिलीप वळसे पाटील यांना क-1 सुवर्णगड बंगला, धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड हा बंगला तर धर्मरावबाबा आत्रम यांना सुरुची -3 हा बंगला, अनिल पाटील यांना सुरुची 8 तर संजय बनसोडो यांना सुरुची 18 बंगला देण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देवगिरी बंगला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आदिती तटकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही -राज्यात सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे नुकतेच सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटातील सात मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून रीतसर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या यादीत आदिती तटकरे यांच्या नावाचा मात्र समावेश नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.