मुंबई -आज जागतिक परिचारिका दिवस आहे. त्यानिमित्त दुपारी १२ वाजता परिचारिका आपल्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी मेणबत्ती किंवा दिवे लावून कोरोना युद्धात जोखमीचे काम करत असलेल्या परिचारिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणार आहेत. शिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव लवकरात लवकर थांबावा यासाठी देखील प्रार्थना केली जाणार आहे.
मुंबईतील जेजे रुग्णालय, कामा, सेंट जॉर्ज, जीटी, राज्यातील वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तब्बल 26 हजार पेक्षा अधिक परिचारिका कार्यरत आहेत. या सर्व या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र गव्हरमेंट नर्सेस फेडरेशनच्या सेक्रेटरी कमल वायकोळे यांनी सांगितले. मुंबईत राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या रुग्णालयात सध्या अडीच हजार पेक्षा परिचारिका कार्यरत आहेत. या परिचारिका थेट कोविड रुग्नाच्या संपर्कात येत असतात. त्यांना योग्य वैद्यकिया साहित्य मिळायाला हवे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक परिचारीका कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. पीपीई किट घातल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामाचे तास कमी करावेत, एक दिवस सुट्टी मिळावी, सुट्टीनंतर सबंधित परिचारिकेला इतर वॉर्डमध्ये ड्युटी मिळावी जेणेकरून कोविडचा संसर्ग कमी होईल. राज्य सरकार या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत फेडरेशनने व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या युद्ध काळात परिचारिकेचे महत्त्व -
डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. मात्र, रुग्णांचा सेवा कोण करतं? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर, नाव येईल परिचारिका. आता कोरोना युद्धाच्या काळात रुग्णाजवळ नातेवाईक नाही, कोणी नाही. त्याला एकटे आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. मात्र, त्याची सेवा करण्यासाठी परिचारिका त्याच्याजवळ असते. त्याला खरा आधार परिचारिकेचा असतो. कोरोना रुग्णांची सेवा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी त्यांना रुग्ण, तर कधी सोसायटीमधील लोक त्रास देतात. त्या कोरोना रुग्णांची सेवा करत असल्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीने त्यांना त्यांच्याच घरापासून, कुटुंबापासून लांब ठेवल्याचा घटना देखील घडल्या आहेत. मात्र, आपल्या कुटुंबापासून दूर राहत, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आपले कर्तव्य बजावत आहे. आज १२ मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन आहे. त्यानिमित्त सर्वांनी परिचारिकांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणे गरजेचे आहे.
का साजरा करतात जागतिक परिचारिका दिवस? -
फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेने रुग्णसेवेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १२ मे १८२० ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी जखमी सैनिकांची सेवा-सुश्रुषा केली. त्यांनी रात्रीच्यावेळी सर्व सैनिकांवर उपचार केले होते. त्यामुळे त्यांना 'लेडी विथ लॅम्प' सुद्धा म्हणतात.
आपल्यासारख्या अनेक परिचारिका तयार व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी १८६० साली लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पीटल येथे पहिलं नर्सिंग स्कूल काढलं. त्यामुळे आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो.