मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आजच्या वृत्तपत्रांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या 'राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे' या जाहिरातीचा समाचार घेतला. या जाहिरातीने शिंदेनी स्वत:चं हसं केलं, असे ते म्हणाले. या जाहिरातीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
'बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला' :अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपण बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत असे म्हणत पक्ष आपल्या ताब्यात घेतला. मात्र जाहिरातीवर ना बाळासाहेबांचा फोटो आहे ना आनंद दिघेंचा. एकनाथ शिंदे बाळासाहेबांना इतक्या लवकर कसे काय विसरले?, असा प्रश्न त्यांनी विचारला. एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला, अशी टीका अजित पवारांनी केली.
'सत्ताधाऱ्यांनी मैदानात येऊन लढावे' : अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी मैदानात येऊन लढावे. तुम्हाला जर जनतेचा पाठिंबा आहे तर तुम्ही निवडणुका का घेत नाही?, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. सत्ताधाऱ्यांमध्ये लोकप्रियतेची स्पर्धा आहे. मात्र त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.
जाहीरातीतून बाळासाहेबांचा फोटो गायब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज सर्व मराठी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात दिली. या जाहिरातीत 'राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे', असे लिहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र', अशा घोषणा देत आले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या नव्या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, या जाहिरातीत केवळ नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेचा फोटो असून, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मात्र गायब आहे.
जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया : या जाहिरातीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आमचे सरकार हे डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी व आर्थिक पाठबळ मिळतो आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो आणि अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प थंडबस्त्यात होते. मात्र आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ते तात्काळ सुरू केले आहेत.'
हे ही वाचा :
- Sadabhau Khot : 'भाजपचं लक्ष आमच्याकडे नाही, मात्र वेळ आल्यावर..', सदाभाऊ खोत यांचा फडणवीसांना इशारा
- Sanjay Raut News: बाळासाहेबांचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो टाकला, पण..संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल