मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत स्वार्थी असून त्यांनी स्वार्थापोटी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा थेट आरोप राज्याच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेला 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादीने केल्याचे म्हटले आहे. मात्र, हा घोटाळा राष्ट्रवादीने नाही तर, अजित पवार यांनी केल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
हजारो कोटी रुपयांचा घोटाळा :अजित पवार यांनी राज्याच्या शिखर सहकारी बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांनी जलसंधारण मंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. त्यांनी खर्च केलेल्या पाटबंधारे विभागाच्या खर्चानंतर ओलिताखाली येणाऱ्या जमिनीचा टक्का एक होता. म्हणजे जवळपास शून्य होता. त्यांच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती यातून समोर येते असे पाटील म्हणाल्या. अजित पवार यांनी आतापर्यंत या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी शरद पवार यांची कवच कुंडले वापरली, मात्र आता त्यांनी स्वतःची कवच कुंडले उतरवून ठेवली आहेत. ज्यादिवशी कर्णाने आपली कवच कुंडली उतरवली त्यादिवशी त्याचा पराभव झाला. त्याचप्रमाणे अजित पवार यांचाही निश्चितच पराभव होईल, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
अजित पवारांनी कारखाने लुटले :राज्यात वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी निर्माण केलेली सहकाराची परंपरा मोडीत काढण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी राज्यातील 45 साखर कारखाने चोरले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. साखर कारखाने आजारी आहेत, असे दाखवून विकायला काढायचे. शिखर बँकेच्या माध्यमातून अत्यंत कमी पैशात हे कारखाने विकत घेऊन ते खासगी करायचे हा डाव गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार करत आहेत. अजित पवार यांनी राज्यातील 13 सहकारी साखर कारखाने, विविध कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःच विकत घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेकडो कोटी रुपयांचे कारखाने केवळ 390 कोटी रुपयांमध्ये अजित पवारांसह त्यांच्या संबंधितांनी विकत घेतले असे, देखील शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे.