अजित पवार यांची पत्रकार परिषद मुंबई Ajit Pawar on Meera Borwankar :माजीआयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. गेल्या तीन-चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी अनेक वर्षे पालकमंत्री होतो, असे अजित पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रसिद्धीसाठी पुस्तकात सनसनाटी गोष्टी : येरवड्यातील सरकारी भूखंड खासगी विकासकाला विकासासाठी देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारनं घेतला. 'मी' तो निर्णय घेतला नव्हता. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय. एखाद्यानं पुस्तकात प्रसिद्धीसाठी काही गोष्टी सनसनाटी लिहिल्या, तर पुस्तक प्रसिद्धीच्या झोतात येईल, असं त्यांना वाटलं असेल, असा टोला अजित पवारांनी बोरवणकरांना लगावलाय.
भूखंडाबद्दल चर्चा केली : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी 2010 मध्ये पुण्यातील येरवडा उपनगरातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्याचा थेट आरोप केलाय. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरोप फेटाळून लावताना बोरवणकर यांच्याशी संबंधित विषयावर मी चर्चा केली, हे मी मान्य करतो. पण तो निर्णय घेण्यासाठी मी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. त्यांनी जागा देण्यास विरोध केल्यानंतर मी त्यांना पुन्हा कधी त्याविषयी विचारले नाही, असं अजित पवार म्हणाले.
भूखंडाबाबत मीरा बोरवणकरांची चौकशी : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना शहरातील अनेक प्रश्न आहेत. पालकमंत्री या नात्यानं संबंधित लोक कधी काही बोलतात, हे पाहावं लागेल. तत्कालीन सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार येरवड्यातील भूखंडाबाबत मीरा बोरवणकर यांची गृहविभागानं चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी हा भूखंड खासगी विकासकाला देण्यास विरोध केला. त्यानंतर मी कधीही त्यांना या प्रकरणावर चर्चा केली नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर असे निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला आहेत. मात्र, असा निर्णय पालकमंत्री घेऊ शकत नाहीत, असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.
हेही वाचा -
- Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांचा 'दादां'वर गंभीर आरोप, पुस्तकात केला 'हा' मोठा खुलासा
- Meera Borwankar : अजित पवारांनी पोलिसांच्या जमिनीचा लिलाव केला, पुस्तकात लिहिलेलं १०० टक्के सत्य; मीरा बोरवणकर ठाम
- Meera Borwankar Book Controversy : मीरा बोरवणकर यांनी विरोध केलेल्या जागेवरुन 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट