मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणे सुरू झाली आहेत. मंगळवारी सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटण्यास गेले. याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचा सिल्वर ओक बंगला गाठला होता.
अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात सापडण्याची भीती निर्माण झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा-उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, ३ डिसेंबरला सिद्ध करावं लागणार बहुमत
अजित पवार हे शरद पवार यांच्या बंगल्यावर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड मोठी धावपळ सुरू झाली. राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड हेदेखील थेट सिल्वर ओक बंगल्यावर धावत आले. तर त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे आदी नेतेही सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले होते.
सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी खलबते सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी अजित पवार यांनी नकार दर्शवल्याने त्यांची मनधरणी केली जात असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा-अजित पवारांची चूक माफ करुन त्यांना पक्षात घ्यावे, छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा
अजित पवार यांनी दुपारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर त्यांनी थेट नेपियन्सी रोड येथील आपले वडील बंधू श्रीनिवास पवार यांचे घर गाठले. अजित पवार तेथे थांबले होते. त्या दरम्यान त्यांनी कोणत्याही कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली नाही. तसेच माध्यमांशीही चर्चा केली नाही. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या 'उर्वशी' बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांची काही वेळ भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अजित पवार हे आपल्या भावाच्या घरी थांबून होते. मात्र संध्याकाळी नऊच्या सुमारास त्यांनी थेट शरद पवार यांचा बंगला गाठला. तेव्हापासून ते पवार यांच्या घरी थांबले होते. कदाचित आपल्या झालेल्या चुकीबद्दल ते पवारांकडे कबुली देत असावेत, असेही सांगितले जात आहे.