मुंबई : Ajit Pawar Group In SC : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय निकाली काढावा यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये अजित पवार गटाविरोधात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी पक्षातून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेबाबत 9 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, दुसऱ्या बाजूने कॅव्हेट दाखल करण्याचं काही कारण नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असला, तरी आम्ही विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
अजित पवार गटातर्फे कॅव्हेट दाखल : दुसरीकडे अजित पवार गटाने देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबत एक कॅव्हेट देखील अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आली आहे. सोमवारच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात यावं अशा प्रकारे कॅव्हेट दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाचं म्हणणं ऐकून घेईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.