मुंबई :आज अजित पवार यांनी विधान भवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांच्या आमदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, कालपासून माझ्याबाबत माझ्या सहकार्याबाबत जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या बातम्या सुरू आहेत. अशा कुठल्याही पद्धतीच्या चर्चा नाहीत. माझ्याबाबत ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या सह्या घेण्यात आल्या नाही. वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्याबाबत भाष्य करतात, त्यात काहीही तथ्य नाही आहे. सर्व जण मला कामानिमित्त भेटत असतात तसे भेटत आहेत. ज्या बातम्या दाखवल्या जातात त्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होतो.
राज्यात अनेक प्रश्न :राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पाऊस, बेरोजगारी, गारपीठ,७५ हजार कामगार भर्ती अजून होत नाही. कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत भेटत नाही आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद आहेत. त्यावरही लक्ष द्यायला हेवे असेही अजित पवार म्हणाले.
खारघर येथे खर्च केलेले १४ कोटी गेले कुठे? :खारघरला जी काही दुर्घटना झाली त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला. एवढ्या उन्हात कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. उशिरा सुद्धा कार्यक्रम घेता आला असता. आम्हाला त्या बाबत राजकारण करायचे नाही. १४ कोटी खर्च केले मग मंडप का घालण्यात आला नाही. राजभवनात हॉलमध्ये किंवा बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घ्यायचा होता. निषकाळजीपणा झाला आहे. हे सरकारचे अपयश आहे. ज्यांचा जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबाला जास्त मदत द्यायची गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या विभागाचे सचिव या सर्वांना समजायला पाहिजे होते. कार्यक्रम कधी घ्यायला हवा होता. असे सांगत अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार निमित्ताने गेलेल्या निष्पाप जीवांवरून सरकारवर निशाणा साधला आहे.