मुंबई - शेतकऱ्यांना पीक विमा देणाऱ्या कंपन्या फायद्यात आहेत. सरकारने खासगी पीक विमा कंपन्या काढून टाकाव्यात आणि आपली सोशल सिक्युरिटी स्कीम तयार करावी, असे कृषीतज्ञ किशोर तिवारी यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकून घ्यायला बोलावले, मी आभारी आहे. सरकारने मला राज्यमंत्री पद दिले, मात्र कोणी ऐकूनच घेत नाही. टिव्हीवाले मला सल्लागार म्हणतात, पण सरकारमध्ये कोणी आमचा सल्ला घ्यायलाच तयार नाही, अशा शब्दात कृषी तज्ञ किशोर तिवारी यांनी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित शिवसेनेच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला.
सर्व कृषी अधिकारी परदेशी वाऱ्या करून आले आहेत आणि सर्व पोट भरण्याचे धंदे सुरू आहेत. या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना समुद्रात टाकून द्यावं, असं मला वाटतं. त्यापेक्षा लोकांना पैसे द्या, मीठ जाळून तेच पाऊस पाडतील. मी पाहिलंय, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हे अधिकारी लॅपटॉप घेऊन येतात, प्रेझेन्टेशन देतात आणि खूप चर्चा करतात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही, अशा शब्दांत तिवारी यांनी सरकारचेच वाभाडे काढले.