नवी दिल्ली/मुंबई - सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रक्लपाचे काम सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. जवळपास 506 किलोमीटरचा हा बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे. मुंबईच्या बीकेसी स्टेशन येथून ही बुलेट ट्रेन अहमदाबादसाठी सुटेल. याच स्टेशनच्या डिझाईन आणि बांधकामासाठी दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्र भागातील कामाचे हे पहिले करार आहेत.
एकूण किती खर्च - NHSRCL च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे महाराष्ट्राच्या बाजूने दिले जाणारे हे पहिले कंत्राट निघाले आहे. बीकेसी स्टेशन कॉम्प्लेक्सचे एकूण क्षेत्रफळ 4.85 हेक्टर असणार आहे. तसेच एकूण खर्च अंदाजे 3 हजार 681 कोटी रुपये अपेक्षित आहे. हे काम सुरू होण्याच्या तारखेपासून ते एकूण पूर्ण होण्याचा कालावधी हा 54 महिने अपेक्षित असणार आहे.
कसे असेल बीकेसी स्टेशन-मुंबईतील बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनला सहा प्लॅटफॉर्म असणार आहेत. तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर राहणार आहे. ही लांबी 16 डब्यांची बुलेट ट्रेन बसवण्यासाठी पुरेशी असणार आहे. हे बुलेट ट्रेन स्टेशन मेट्रो आणि जवळील महत्वाच्या रस्त्यांशी जोडले जाणार आहे. तसेच हवा खेळती राहण्यासाठी विशेष खिडक्या बसवण्यात येणार आहेत. याबरोबरच सुर्यप्रकाश थेट स्टेशनमध्ये यावा यासाठी खास यंत्रणा बसवण्यात येणार आहे.