मुंबई - मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ व्हावे. विद्यापीठाने तत्काळ फी माफीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूज येथील कलिना संकुलात उपोषण केले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने आज(मंगळवारी) फी माफीचे परिपत्रक जारी केले असल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेतले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मुंबई विद्यापीठाने नुकतेच राज्यातील शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे परिपत्रक काढले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. यारम्यान, छात्र भारती विद्यार्थी संघटनेने पत्रव्यवहार करून सोमवारी कलिना संकुलात बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणास संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले आणि काही विद्यार्थी बसले होते.