मुंबई - मेट्रोचे इंटिग्रेटेड कारशेड रद्द करुन आता लाईन 6 शेड कांजूरमार्गला करण्याचा घाट घातला जात आहे. त्यावर यामध्ये मोठे गौडबंगाल असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. खरे तर महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार तिथे इंटिग्रेटेड कारशेड झाले असते तर सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या असत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे 10 हजार कोटी रुपये वाचले असते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते.
कांजूरमार्ग कारशेडवरुन यामुळे नजिकच्या काळात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरेमध्ये पुन्हा मोठे आंदोलन होण्याचीही शक्यता आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली त्या ठिकाणी आणखी 84 झाडे कापण्याचा प्रस्ताव कोर्टाला दिला असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. एवढा राग मुंबईकरांवर का आहे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या कॉरिडॉरच्या डेपोबाबत नुकताच राज्यसरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाला कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जागा ताब्यात देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यास सांगितले आहे. यामध्ये शिंदे फडणवीस सरकारला कुणाचा फायदा करुन द्यायचा आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कांजूरमधील ती 15 हेक्टर जागा नेमकी कुणाची असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. कारण यातील 15 हेक्टर जागा मेट्रो लाईन 6 ला दिली जाणार आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २०२० मध्ये मेट्रो 6 तसेच मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कॉरिडॉरसाठी एकात्मिक डेपोचा प्रस्ताव दिला होता.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर लगेचच मेट्रो 3 साठी डेपो बांधण्याचे आदेश दिले. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे मेट्रो 6 डेपोचे काय याचा प्रश्न बाकी होता. एमएमआरडीएने जुलै 2022 मध्ये पत्र लिहून कांजूरमार्ग येथे 50% काम पूर्ण झाल्यामुळे जमिनीची मागणी केली होती. दुसरीकडे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने आता स्पष्ट केले आहे की, कांजूरमार्ग जमिनीसाठी महसूल विभागाची मंजुरी मिळाली आहे आणि आता डेपोसाठी सुमारे 15 हेक्टर जमीन सुपूर्द करण्यासाठी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश मिळाले आहेत.
आता याचमुद्यावरुन आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरले आहे. 45 हेक्टरपैकी फक्त 15 हेक्टर जागा घेणार आहेत. मग आजूबाजूची जागा कुणाच्या घशात घालणार असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. आता यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या कलगी तुऱ्याल सुरुवात होणार असे दिसत आहे.