मुंबई : मुंबईतील रस्त्यांची कामे दिलेल्या ठेकेदारांचे दहा टक्के अनामत रक्कम राखून ठेवा, आणि मुंबईकरांची लूट थांबवा, अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या कामातून राजकीय नेत्यांचा खिसा भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. लोकशाही नसलेल्या प्रशासकाकडून उत्तरे आणि कारवाईची अपेक्षा असल्याचा खोचक टोलाही ठाकरेंनी लगावला आहे. महापालिका आयुक्तांना ठाकरे यांनी लिहिलेले आजवरचे हे दुसरे पत्र आहे.
ठेकेदारांकडून लूट होण्याची शक्यता : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेचारशे मीटर पर्यंतचे रस्ते सिमेंट काँक्रीट केले जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने रस्ते कामांचा बार उडवला आहे. या कामात मोठ्या प्रमाणात ठेकेदारांकडून लूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्यांची काम सुरू होत नाहीत, तोपर्यंत दहा टक्के रक्कम रोखून धरावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
'ऍडव्हान्स मोबिलायझेशन' : मुंबईतील रस्ते कामांसाठी 650 कोटी अनामत रक्कम देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दर महिन्याला या रकमेतून सुमारे साडेतीन कोटी रुपये व्याज मिळणार आहे. त्यामुळे आठ महिन्यांचे तीस कोटी रुपये व्याज होईल. रस्ते कामाला सुरुवात होण्यापूर्वीच अनामत रक्कम दिल्यास ठेकेदारांना त्याचा फायदा होईल. ठेकेदारांची ही लूट थांबवण्यासाठी आणि राजकीय नेत्यांचा फायदा होऊ नये, हा मागचा उद्देश असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, 2023 चे रस्त्यांची काम सुरू होणार असताना 'ऍडव्हान्स मोबिलायझेशन' म्हणून कंत्राटदारांना 650 कोटी रुपये का दिले जात आहेत, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला आहे. हे 650 कोटी रुपये मुंबईकरांचे असून त्यांची लूट थांबायला हवी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.