मुंबई Aditya Thackeray : मागील अनेक वर्षापासून मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) न्यास समितीत ठाकरे गटाचंच वर्चस्व होतं. मात्र येथे देखील आता शिंदे गटाने शिरकाव केला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आता ठाकरे गटातील युवा नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल (Aditya Thackeray Attack On Sada Sarvankar) केला आहे. आदित्य ठाकरेंनी X वरुन पोस्ट करत शिंदे गट, भाजपा व सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपतीच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
'मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व': आदित्य ठाकरेंनी पुढे पोस्टमध्ये म्हटलंय की, ज्यांनी गणेशोत्वात हवेत गोळीबार केला. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजपा सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसेन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती. अटक व्हायला हवी होती. पण या कृत्याबद्दल त्यांना बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय. मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?, खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्र द्वेषाचं बक्षीस दिलं असेल. असं आदित्य ठाकरेंनी म्हणत शिंदे गट, भाजपा व सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे.