मुंबई- नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने 3 वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेत केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ही खूप वाईट घटना आहे. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी हैदराबाद आणि जेएनयू येथील विद्यार्थी संघटनांनीही पुढे आले पाहिजे, असेही आवाहनही सदावर्ते यांनी केले आहे.
अॅड. सदावर्ते बोलताना....
पायल तडवी (वय २३) हिने नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. नायर रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पायलला न्याय मिळावा, म्हणून आज काही संघटनांनी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. या घटनेत आता अॅड सदावर्ते यांनीही उडी घेत या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून व्हावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणातील आरोपींना पोलीस वाचवत आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल होण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ कसा लागला. या आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे. यामुळे या घटनेची केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी झाली पाहिजे. एसआयटी स्थापन झाली पाहिजे. डॉक्टर पायल तडवी हिचा मृत्यू जातिवादातून झाला आहे. हे पोलीस यंत्रणेला माहिती होते. तरी सुद्धा रिपोर्ट रजिस्टर करण्यासाठी विलंब करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर भारतीय जनता पक्षाचे राजकीय वरदहस्त आहे. तर आरोपींचे कुटुंबातील काही मंडळी वकील आहेत. याकारणाने तपासामध्ये विलंब होत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.