मुंबई - मराठी रंगभूमी, चित्रपट आणि 'तुला पाहते रे' या झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेतल्या आईसाहेब या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री विद्या करंजीकर यांना नाशिक मुंबई प्रवासात एक विचित्र अनुभव आला. एका व्यक्तीनं नाशिकमधून शेअर टॅक्सीतून कुत्र्याच्या पिल्लाला बास्केटमधून पाठवल्याचा हृदयस्पर्शी किस्सा त्यांनी सांगितलाय. प्राणी जीव संरक्षण संबंधी किंवा 'पेटा'शी संबंधीत लोकांना आवाहन करुन त्यांनी याबद्दल पुढे काय करता येईल, याविषयी विचारणाही केलीय.
अभिनेत्री विद्या करंजीकरांचा एक व्हिडिओ त्यांचे पती अभिनेता आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये त्यांनी आपल्याला आलेल्या विचित्र अनुभवाचं कथन केलंय. त्या नाशिक ते मुंबई प्रवास करण्यासाठी मुंबई नाक्यावर पोहोचल्या होत्या. तिथं एक शेअर टॅक्सी मुंबईला जाण्यासाठी उभी होती. पॅसेंजर्सची प्रतीक्षा करणाऱ्यां तिघा प्रवाशांमध्ये विद्याही सामील झाल्या. काही वेळानंतर एक व्यक्ती हातात बास्केटमधून कुत्र्याचं पिल्लू घेऊन तिथं आली आणि ड्रायव्हरशी बोलून त्या व्यक्तीनं एक सौदा केला. त्यानंतर ड्रायव्हरनं गाडी सुरू केली.
विद्या ड्रायव्हर शेजारी बसल्या, मागे दोन लोक बसले आणि त्यांच्यामध्ये ते कुत्र्याचं पिल्लू असलेलं बास्केट ठेवण्यात आलं आणि तो माणूस निघून गेला. याबद्दल विद्या यांनी ड्रायव्हरला विचारलं असता त्यानं हे पिल्लू वाटेत एका ठिकाणी थांबलेल्या व्यक्तीला द्यायचंय, असं सांगितलं. या पिल्लाला प्रवासात काही झालं तर? असे प्रश्न विद्या यांना पडले. पण ते लोक बेफिकीर होते. प्रवासात ते पिल्लू ओरडू लागलं. पण सर्वांचाच नाईलाज होता. अखेर ज्या ठिकाणी ते पिल्लू घेण्यासाठी व्यक्ती येणार होती तिथे ती व्यक्ती आलीच नाही. खूप काळानंतर विद्या यांनी चिडून पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण अपेक्षित साथ मिळाली नाही. पिल्लाचे होणारे हाल त्यांना पाहावत नव्हते आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला जाण्यासही विलंब होत होता, अशा दुहेरी अडचणीत त्या सापडल्या होत्या. अखेर ते तिथून निघाल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन आला व अजून थोडा वेळ थांबण्याची विनंती करु लागला. खूप प्रतीक्षेनंतर ती व्यक्ती दुचाकीसह आली व कुत्र्याचं पिल्लू असलेलं बास्केट घेऊन गेली.