मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज (मंगळवारी) औपचारिकरित्या शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे यांच्याहस्ते ऊर्मिला यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तर आता त्यांना पक्षात कोणते पद दिले जाणार? त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस ते शिवसेना प्रवास -
अभिनेत्री मातोंडकर यांना लहानपणापासून समाजवादी विचारांचे बाळकडू मिळाले. मात्र, त्या राजकारणापासून लांब होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून उत्तर-मुंबई मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली. मात्र, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.