मुंबई -रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज अभिनेत्री पायल घोषने आरपीआयमध्ये प्रवेश केला. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपवर कथित लैंगिक शोषणाचा आरोप पायल घोषने केला होता. तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) तिला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून पायल आरपीआयमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. आरपीआयमध्ये पायल घोषला महिला मोर्चाचे उपाध्यक्ष पद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच तिच्या वकिलाला सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे.
पायलने घेतली होती राज्यपालांची भेट -
20 सप्टेंबरला पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. १ ऑक्टोबर रोजी रोजी कश्यपला वर्सोवा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. मात्र या प्रकरणाची चौकशी बरोबर होत नसल्याने तीने आरपीयचे प्रमुख नेते रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली होती. पायलच्या जीवाला धोका असल्यामुळे तिला पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी देखील केली, आठवले यांनी केली होती.