मुंबई / पुणे : १० वी, १२ वी परीक्षेतील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी एक कृती कार्यक्रम स्पर्धा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळे विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. त्यात एकसुत्रीपणा आणण्यासाठी एक कृती कार्यक्रम तयार करण्याचे राज्य शिक्षण मंडळाने ठरविले आहे अशी माहिती सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
कृती कार्यक्रम तयार करणार :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत नऊ विभागीय मंडळमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.१० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.१२ वी या दोन सार्वत्रिक परीक्षाचे आयोजन करण्यात येते. परीक्षेच्या कालावधीत विविध मार्गांनी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपकम राबवित असतात. तथापि या प्रयत्नात एकसूत्रीपणाची गरज सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व समावेशक असा कृती कार्यक्रम तयार करण्याचे मंडळाने ठरविले आहे.
येथे पाठवा कृती कार्यक्रम :परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजमाध्यम इत्यादींच्याकडून परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण कृतिकार्यक्रम मागविण्यात येत आहेत. आपला कृतिकार्यक्रम विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने नमूद नोंदवावयाचा आहे. या लिंकवरील प्राप्त कृतिकार्यक्रमाचे मूल्यमापन करून यापैकी दहा उत्कृष्ट, निवडक कृतिकार्यक्रमाची तज्ञ समिती मार्फत निवड करून सदर कृतिकार्यक्रम पाठविणा-यांचा मंडळामार्फत यथोचित गौरव करण्यात येईल, तज्ञ समितीचा निर्णय अंतिम असेल. याकरिता मंडळाने गुगल फॉर्म तयार केला आहे.