मुंबई :ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या डोंबिवली पूर्व येथील चंद्रेश वास्तु एफ गृहनिर्माण सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे पर्यटन, महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या बांधकाम कंपनीच्या माध्यमातून लोढा हेरिटेजच्या वतीने हे बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय नियमांना डावलून अवैधपणे निवडणूक घेतल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात काही सदस्यांनी शासनाकडे तक्रार दाखल केली होती, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकाम? :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक गृहनिर्माण सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच या गोष्टी घडत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सावे यांनी सांगितले.
लोढा हेरिटेज बांधकामावर कारवाई :यासंदर्भात नगर विकास विभागाकडून माहिती घेतल्यानंतर लोढा हेरिटेज अंतर्गत चंद्रेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी पाहणी केली आहे. या पाहणीमध्ये सोसायटीच्या गच्चीवरील शेड, दुकानांवरील शेड, बाथरूम, सोसायटी कार्यालय, महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगीशिवाय केल्याचे आढळून आले आहे. सदर बांधकामे इमारत बांधतानाच केलेली आहेत, मात्र त्यासाठी कुठल्याही पद्धतीची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बांधकामे अनधिकृत, बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे, असेही अतुल सावे यांनी सांगितले.