मुंबई - राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी व्यापारी गैरफायदा घेऊन साठेबाजी करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री - uddhav thackeray news
जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी व्यापारी गैरफायदा घेऊन साठेबाजी करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ज्या नागरिकांना होम क्वॉरेंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरेंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.