मुंबई:2018 मध्ये 35 वर्षीय पीडित महिलेने दिलेला तक्रारीवरून अनुपम दास विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 376 (2)(N) ३२८, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध आरोपी अनुपम दासने महिलेला तिच्या इच्छित स्थळी सोडतो, असे सांगून बसमध्ये बसविले आणि महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत तक्रारदार पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपी फरार: गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा वारंवार शोध घेतला; परंतु तो गेल्या ५ वर्षांत विक्रोळी पोलीसांच्या हाती लागला नाही. तसेच या आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने हा गुन्हा 'अ' वर्गीकरण समरीसाठी न्यायालयात सादर करण्यात आला होता.
अखेर आरोपी गवसलाच: सन २०१८ पासून या बलात्काराच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा गेली ५ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून स्वतःच्या गावापासून दूर मैसुर, कर्नाटक येथे काम करीत होता. गुन्हे शाखेच्या कक्षा ७ चे पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम व पथक यांनी या आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढून पीडित महिलेस न्याय मिळवून दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक काळे आणि पथकाने आरोपी अनुपम दास याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता विक्रोळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.