मुंबई- पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित आरोपीने चक्क पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून पलायन केले आहे. इम्रान उर्फ इमू सैफुला खान असे या आरोपीचे नाव आहे.
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार - शिवाजी नगर पोलीस ठाणे
आरोपी शौचालयात गेला असताना एक हवालदार शौचालयाच्या बाहेर तैनात ठेवला होता. परंतु, या आरोपीने चक्क शौचालयामधील खिडकीच्या काचा आणि गज काढून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत पलायन केले.
आज (शनिवारी) सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस गोवंडी, शिवाजी नगर भागात गस्त घालत असताना पोलिसांना पटलावरील आरोपी असलेला इम्रान संशयितरित्या विभागात फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि हातकड्या घालून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणले. परंतु, त्यानंतर इम्रानने सकाळी 8 वाजता पोलिसांना टॉयलेटला जायचे आहे, असे सांगितले.
पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यातील शौचालयात नेले आणि एक हवालदार शौचालयाच्या बाहेर तैनात ठेवला होता. परंतु, या आरोपीने चक्क शौचालयामधील खिडकीच्या काचा आणि गज काढून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत पलायन केले. ही सर्व घटना समोरच असलेल्या म्हाडा इमारतीमधील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आणखी एक गुन्हा इम्रान विरोधात नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.