मुंबई - सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी सर्वत्र होत्या. मात्र, आपण राजीनामा दिला नसून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच आपण पुढील भूमिका स्पष्ट करू असे सत्तार म्हणाले होते. आज(रविवार) राज्यमंत्री सत्तार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरता मातोश्रीवर आले आहेत. त्यांच्या भेटीनंतर पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.
अब्दुल सत्तारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारी सर्वत्र पसरले होते. ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. शिवसेना नेत्यांनी काल(शनिवार) भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी पक्षप्रमुखांना भेटावे, त्यानंतरच काय ती भूमिका आणि मत स्पष्ट करावं, अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती.