मुंबई - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, इतर काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मुंबईत दुसरी लाट आलीच तर, महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, महापालिकेच्या उपाययोजनांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला.
जगभरातील अनेक देशांत थंडीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दुसरी लाट आली तर, महापालिकेने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाची दुसरी लाट आली तर प्रशासनाची काय तयारी आहे? पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का ? याची माहिती आदित्य ठाकरे यांनी घेतली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने उभारलेल्या सर्व जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरू करणार असल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, मोफत टेस्टिंग सेंटरवरही अतिरिक्त कर्मचारी आणि इतर सुविधा देणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता राज्य सरकारने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. थंडीचा हंगाम असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, खबरदारी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.